लवकरच भेटीला येणार नवीन ‘हॅरी पॉटर’ वेब सीरिज, ‘हे’ कलाकार दिसणार प्रमुख भूमिकेत

Harry Potter web series Casting | जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘हॅरी पॉटर’ची (Harry Potter) जादूई दुनिया पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. आधी पुस्तक व त्यानंतर चित्रपटांच्या माध्यमातून हॅरी पॉटरने जगभरातील प्रेक्षकांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. आता यावर आधारित नवीन वेब सीरिज येणार आहे.

HBO या लोकप्रिय नेटवर्कने या क्लासिक पुस्तक मालिकेवर आधारित नवी वेब सीरिज(Harry Potter web series) आणण्याची तयारी सुरू केली असून, या मालिकेसाठी महत्त्वाच्या पात्रांची कलाकार माहिती जाहीर करण्यात आली.

‘व्हेरायटी’च्या रिपोर्टनुसार, अल्बस डंबलडोर, सेव्हरस स्नेप, मिनर्व्हा मॅकगॉनगल आणि रुबिअस हॅग्रिड या लोकप्रिय पात्रांसाठी नवे चेहरे निवडण्यात आले आहेत. या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना जोर चढला आहे.

डंबलडोरची भूमिका आता ‘द क्राउन’ फेम जॉन लिथगो साकारणार आहेत, तर जेनेट मॅकटीर (Janet McTeer) मॅकगॉनगलच्या रूपात दिसणार आहेत. पापा एसेइडू (Papa Essiedu) ‘गँग्स ऑफ लंडन’मधून प्रसिद्ध झाले असून, ते स्नेपच्या भूमिका साकारतील. ‘शॉन ऑफ द डेड’ फेम निक फ्रॉस्ट (Nick Frost) हॅग्रिडच्या रूपात झळकतील.

याशिवाय, लूक थॅलोन (Luke Thallon) क्विरिनस क्विरेल तर पॉल व्हाईटहाउस (Paul Whitehouse) आर्गस फिल्चची भूमिका साकारणार आहेत. काही कलाकारांची नावे अपेक्षित होती, पण काहींच्या निवडींनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

या मालिकेचे लेखन आणि कार्यकारी निर्मिती फ्रान्सिस्का गार्डिनर करणार आहेत. अनेक भागांचे दिग्दर्शन आणि निर्मिती मार्क मायलोड करणार असून, त्यांनी एका संयुक्त निवेदनात सांगितले की, “इतक्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ते या पात्रांना कसे नव्या रूपात साकारणार हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.”

या मालिकेसाठी हॅरी, रॉन आणि हर्मायनी या मुख्य पात्रांसाठी ओपन कास्टिंग कॉल जाहीर करण्यात आला होता, ज्याला तब्बल 30,000 हून अधिक अर्ज आले आहेत.

या भव्य प्रोजेक्टसाठी ब्रॉन्टे फिल्म अँड टीव्ही (Bronte Film and TV) आणि वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन (Warner Bros. Television) यांचा सहभाग आहे. जे.के. रोलिंग (J.K. Rowling), नील ब्लेअर, रुथ केनली-लेट्स आणि डेव्हिड हेमन हे सीरिजचे कार्यकारी निर्माते आहेत.