Actor Atul Kulkarni visits Pahalgam | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ( Pahalgam Terror Attack) किमान 26 लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या काही दिवसांनंतरच प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) पहलगामला भेट दिली आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला फटका बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. भीतीमुळे अनेक नागरिक येथे येणे टाळतील, असे मत व्यक्त केले जात होते. मात्र, आता मराठी अभिनेत्याने काश्मीरला भेट दिली आहे.
अतुल कुलकर्णीने त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि लोकांना काश्मीरला घाबरू नका, असे आवाहन केले. “हे आमचे काश्मीर आहे, हा आमचा देश आहे, आम्ही येणार.”, असे त्याने सोशल मीडियावर लिहिले.
27 एप्रिल रोजी कुलकर्णी यांनी पहलगाम भेटीदरम्यानचे आणि एका दुकानात स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेतानाचे काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला. एका फोटोमध्ये ते “आय लव्ह पहलगाम” फोटो बूथवर पोज देताना दिसत आहेत.
“ही भारताची संपत्ती आहे. धैर्य भीतीपेक्षा मोठे असते. द्वेष प्रेमापुढे हरला आहे. चला काश्मीरला जाऊया. चला सिंधू, झेलमच्या किनाऱ्यावर जाऊया. मी आलो आहे, तुम्हीही या.”, असे त्याने लिहिले. दुसऱ्या एका फोटोत ते काश्मीरमधील एका दुकानातून क्रिकेट बॅट खरेदी करताना दिसत आहेत.
अतुल कुलकर्णी म्हणाला की, जगाला एक संदेश देण्यासाठी तो पहलगामला भेट देऊ इच्छित होता. “22एप्रिल रोजी घडलेल्या घटनेने संपूर्ण देश दुःखी झाला आहे. मी वाचले की येथील 90 टक्के बुकिंग रद्द झाली आहेत. दहशतवादी संदेश देत आहेत की काश्मीरमध्ये येऊ नका. हे होणार नाही. हे आमचे काश्मीर आहे, आमचा देश आहे आणि आम्ही येथे येणार. दहशतवाद्यांच्या विचारसरणीला आपण दिलेले हे उत्तर असले पाहिजे. मुंबईत बसून मी हा संदेश देऊ शकत नव्हतो, म्हणून मी येथे आलो. जर मी येऊ शकतो, तर उर्वरित देशही येथे येऊ शकतो. आपण येथे आले पाहिजे आणि घाबरू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजवरही काश्मीर भेटीचे फोटो शे्र केले आहेत. जवळपास रिकाम्या विमानाचे फोटो शेअर करण्यापासून ते स्थानिकांशी संवाद साधण्यापर्यंत, त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना काश्मीरला भेट देण्याचे आवाहन केले. काही स्थानिकांनीही या हल्ल्याचा निषेध करताना दिसत आहेत. त्याने शेअर केलेल्या काही व्हिडिओमध्ये अनेक पर्यटक पहलगाम आणि काश्मीरच्या इतर भागांना भेट देताना दिसत आहेत.