महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकवणारा पृथ्वीराज मोहोळ कोण आहे? जाणून घ्या

Maharashtra Kesari : अहिल्यानगर येथे रंगलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 चा किताब पुण्याचा पृथ्वीराज मोहोळने पटकवला. सोलापुरचा कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पृथ्वीराजने मानाची गदा जिंकली. विजयानंतर पृथ्वीराजने त्याच्या वडिलांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष देखील केला.

महाराष्ट्र केसरी 2025 वादामुळे देखील विशेष गाजली. अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याने अचानकपणे मैदान सोडण्याचा निर्णय घेतल्याने पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले. तर मॅट विभागातील उपांत्य फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज यांच्या सामन्यादरम्यानही मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पंचांचा निर्णय मान्य नसल्याने यात वाद झाला. शिवराजने पंचाची कॅालर धरत लाथ घातल्याचे पाहायला मिळाले.

कोण आहे पृथ्वीराज मोहोळ?

कुस्ती आणि मोहोळ कुटुंबाचे अतूट नाते आहे. पृथ्वीराज मोहोळमुळे आता आजोबापाठोपाठ नातवाने देखील महाराष्ट्र केसरी किताब पटकवण्याची कामगिरी केली आहे. पृथ्वीराजचे आजोबा यांनी देखील महाराष्ट्र केसरी हा किताब पटकवला आहे.

1989-90 ला वर्धा येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेत पृथ्वीराजचे आजोबा अमृता मोहोळ यांनी सतीश मांडियाचा पराभव करून महाराष्ट्र केसरी किताब पटकवला होता. पृथ्वीराज हा मुळशीतील मुठा या गावचा आहे. हे कुस्तीगीर परिषदेची स्थापना करणाऱ्या दिवंगत मामासाहेब मोहोळ यांचे गाव आहे. त्यांच्या स्मरणार्थच महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठित चांदीची गदा प्रदान केली जाते.

पृथ्वीराजचे वडील देखील कुस्तीपटू आहेत. त्यांना 1999 साली नागपूर येथे पार पडलेल्या स्पर्धेदरम्यान उपांत्य सामन्यात पराभवाचा करावा लागला होता. याशिवाय, त्याच्या चुलत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. आता अखेर पृथ्वीराज मोहोळच्या विजयामुळे महाराष्ट्र केसरीची गदा पुन्हा मोहोळ कुटुंबाकडे आली आहे.