Aaradhya Bachchan: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. आराध्या वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकदा चर्चेत असते. आता तिने दिल्ली उच्च न्यायालयात एक नवीन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर कारवाई करताना दिल्ली उच्च न्यायालयाने गूगल आणि इतर अनेक वेबसाइट्सना नोटीस पाठवली आहे.
नक्की प्रकरण काय?
आराध्याने तिच्या आरोग्याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या खोट्या माहितीविरोधात याचिका दाखल केली आहे. तिने गुगल व इतर वेबसाइट्सवर असलेल्या खोट्या माहितीबाबत ही याचिका दाखल केली आहे. यापूर्वी तिने एप्रिल 2023 मध्येही याचिका दाखल केली होती.
आराध्याला गंभीर आजार असल्याची खोटी माहिती अनेक वेबसाइट्सवर प्रकाशित करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. काही वेबसाइट्सने तिच्या निधनाची बातमीही दिली होती. याआधीही तिने अल्पवयीन असल्याचे कारण देत अशाप्रकारची चुकीची व भ्रामक माहिती छापण्यापासून रोखले जावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने अशाप्रकारची माहिती तातडीने काढून टाकण्याचे आदेश देखील होते. मात्र, तरीही अद्याप काही खोटी माहिती पसरवणारे व्हिडिओ आणि लेख गुगलवर असल्याने आराध्याने पुन्हा न्यायालयात धाव घेतली.
आराध्याच्या याचिकेनंतर आता न्यायालयाने गुगलसह अनेक वेबसाइट्सला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मार्च रोजी होणार आहे.