WhatsApp Scam | सायबर गुन्हेगार आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना गंडवत आहेत. पुण्यातील प्रदीप जैन या 28 वर्षीय तरुणाला व्हॉट्सॲपवर (WhatsApp) पाठवलेल्या एका साध्या फोटोमुळे तब्बल ₹2.01 लाख गमवावे लागले आहेत.
व्हॉट्सॲपवर आलेला एक फोटो डाउनलोड केल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या प्रकारामध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान म्हणजे लीस्ट सिग्निफिकंट बिट स्टेग्नोग्राफी हे असून, याच्या मदतीने फोटोमध्ये हॅकिंग कोड लपवण्यात आले होते.
प्रदीप जैन यांना सकाळी एका अनोळखी नंबरवरून सतत फोन येत होते. काही वेळानंतर त्या नंबरवरून त्यांना एका वृद्ध व्यक्तीचा फोटो पाठवण्यात आला, ज्यावर “तुम्ही या व्यक्तीला ओळखता का?” असा मजकूर होता. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही सततच्या कॉलमुळे अखेर जैन यांनी तो फोटो डाउनलोड केला आणि काही मिनिटांतच त्यांच्या कॅनरा बँक खात्यातून ₹2.01 लाख गायब झाले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहेत.
ही रक्कम हैदराबादमधील एटीएम मधून काढण्यात आली. यावेळी हॅकर्सनी जैन यांच्या आवाजाची नक्कल करून बँकेलाही फसवले. बँकेच्या कॉलला उत्तर देताना त्यांनी अशीच भाषा आणि आवाज वापरून व्यवहारास मान्यता दिली.
या प्रकारात वापरलेले LSB स्टेग्नोग्राफी हे तंत्र म्हणजे मीडिया फाईल्स – जसे फोटो किंवा ऑडिओ – यामध्ये डेटा लपवण्याची अत्याधुनिक युक्ती आहे. सायबर तज्ज्ञाच्या मते, “हा तंत्रज्ञानाचा वापर करुन कोड फाईलमध्ये लपवता येतो. पारंपरिक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे सहज ओळखू शकत नाहीत.”
2017 मध्येही याच तंत्राचा वापर करून व्हॉट्सॲपवर जीआयएफ फाईल्सद्वारे एक्झिक्युटेबल कोड पाठवण्यात आला होता. 2019 नंतर या पद्धती अधिक स्मार्ट आणि धोकादायक झाल्या असून, यासाठी आता AI आणि मशीन लर्निंग (AI and Machine Learning) चा वापर करून अनियमित वर्तन शोधणं गरजेचं असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
ही घटना सामान्य नागरिकांसाठी एक मोठा इशारा आहे. व्हॉट्सॲपवर अनोळखी फोटो किंवा मीडिया फाईल्स डाउनलोड करताना अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.