पुणे (Pune) येथील व्यावसायिक कर अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने ॲप-आधारित अन्न व किराणा वितरण करणाऱ्या स्विगी (Swiggy) कंपनीला रुपये 7.59 कोटींची मूल्यांकन नोटीस पाठवली आहे. ही नोटीस 2021-22 आर्थिक वर्षातील कथित कर उल्लंघनांशी संबंधित आहे.
स्विगीने ही माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) ला सादर केलेल्या निवेदनात दिली आहे. त्यानुसार, 5 एप्रिल 2025 रोजी ही नोटीस कंपनीच्या हाती आली असून, ती 4 एप्रिल 2025 रोजी जारी करण्यात आली होती. या नोटीसमध्ये रुपये 7,59,86,813/- इतकं मूल्यांकन नमूद करण्यात आलं आहे.
स्विगीने स्पष्ट केलं आहे की, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक, व्यापार, आजिविका आणि रोजगार कर अधिनियम (Professional Tax Act, Maharashtra), 1975 अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून व्यावसायिक कर कपात न केल्याचा दावा या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
कंपनीने आपल्या प्रतिक्रियेत नमूद केलं, “कंपनीला विश्वास आहे की या आदेशाविरुद्ध आमच्याकडे मजबूत युक्तिवाद आहेत. आमच्या हितासाठी आम्ही पुनरावलोकन व अपील प्रक्रिया राबवत आहोत. या आदेशामुळे कंपनीच्या आर्थिक व व्यावसायिक कार्यक्षमतेवर कोणताही मोठा नकारात्मक परिणाम होणार नाही.”
व्यावसायिक कर (Professional Tax) हा कर महाराष्ट्र शासनाने लागू केलेला असून, तो व्यक्तीच्या व्यवसाय, नोकरी किंवा आजिविकेवर आकारला जातो. हा कर कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करून प्राधिकरणाकडे जमा केला जातो.
दरम्यान, ही स्विगीला आलेली दुसरी सरकारी नोटीस आहे. याआधी, 29 मार्च 2025 रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर विभाग (Income Tax Department) कडून रुपये 158.28 कोटींची नोटीस बजावण्यात आली होती. ती आयकर अधिनियम, 1961 (Income Tax Act, 1961) अंतर्गत असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.