Ladki Bahin Yojana : ‘2100 रुपये देणार असे कोणीही म्हटलेले नाही…’, लाडक्या बहीण योजनेबाबत सरकारच्या मंत्र्यांचे मोठे विधान

Narhari Zirwal on Ladki Bahin Yojana

Narhari Zirwal on Ladki Bahin Yojana | राज्य सरकारकडून दरमहिन्याला लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला विजयी होण्यात या योजनेचा मोठा वाटा होता. या योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये केले जाणार असल्याचे आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, आता सरकारच्याच एका मंत्र्यांने 2100 रुपये देण्याचे कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते, असे वक्तव्य केले आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते नरहरी झिरवळ यांनी जळगाव येथे बोलताना लाडकी बहीण योजनेविषयी वक्तव्य केले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कोणीही अधिकृतपणे जाहीर केले नव्हते, असे वक्तव्य झिरवळ यांनी केले आहे.

नरहरी झिरवळ काय म्हणाले ?

लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देऊ असे कोणीही म्हटलेले नाही. हे सर्व विरोधकच सांगत असतात. 1500 रुपये देणार नाहीत, असा प्रचार विरोधकांनी केला होता. आता 2100 रुपये देणार, असा प्रचार देखील विरोधकच करत आहेत. लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये खूश आहेत, असे वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केले आहे.

नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्यानंतर आता महिलांना लाडकी बहीण योजनेंतर्गत खरचं 2100 रुपये मिळणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या रकमेबाबत नाराजीचं वातावरण काही अंशी पाहायला मिळत आहे. विशेषतः एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे की, एप्रिलचे पैसे कधी मिळणार आणि 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार की नाही?

या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aaditi Tatkare) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिनाअखेरीस मिळेल. योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ज्या महिलांचे कुटुंब उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच निधी दिला जात आहे.”अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.