औरंगजेबाची कबर असलेल्या ‘खुलताबाद’चं नाव होणार ‘रत्नपूर’, संजय शिरसाटांची घोषणा

Renaming Of Khuldabad To Ratnapur | छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील खुलताबाद (Khultabad) येथे असलेल्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून महाराष्ट्रात राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कबरीच्या हटवणीची मागणी केली असतानाच, आता खुलताबादचे नाव बदलण्यात येणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठी घोषणा करत खुलताबादचं नाव ‘रत्नपूर’ (Ratnapur) करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

खुलताबादचा उल्लेख करताना शिरसाट म्हणाले की, “या गावाचं नाव पूर्वी रत्नपूर होतं. मात्र औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद केलं. तसंच दौलताबाद (Daulatabad) हे पूर्वी ‘देवगिरी’ (Devgiri) म्हणून ओळखलं जात होतं. औरंगजेबाच्या कारकिर्दीत अनेक शहरांची नावे बदलली गेली. आता ती सर्व नावं पुन्हा मूळ स्वरूपात आणण्याची प्रक्रिया सरकारने हाती घेतली आहे.”

संजय शिरसाट यांनी सांगितले की, “खुलताबाद, दौलताबादसह (Daulatabad) अशा ‘बाद’ प्रत्यय असलेल्या सर्व शहरांची नावं आता बदलली जातील. यामागे केवळ नामांतर नव्हे तर ऐतिहासिक दृष्टीकोन, मराठ्यांचा सन्मान आणि जनभावना यांचा विचार केला जात आहे.”

शिरसाट यांनी आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, खुलताबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे भव्य स्मारक उभारण्याचा विचार सुरू आहे. “मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून हे स्मारक असावं, यासाठी नागरिकांकडून निवेदने आली आहेत. त्यानुसार शासन सकारात्मक विचार करत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते?

दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं की, “ही कबर पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकांमध्ये असून ती हटवता येणार नाही. मात्र, औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही.”

खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. नागपूरमध्ये याच मुद्द्यावरून दंगलसुद्धा उसळली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत आंदोलनं तीव्र केली होती. याच पार्श्वभूमीवर नामांतरासारखा निर्णय घेतला जात आहे.