अष्टविनायकाला जाताय? मोरगाव, थेऊरसह 5 मंदिरांमध्ये आता ‘असा’ पोशाख बंधनकारक

Maharashtra Temples Dress Code

Maharashtra Temples Dress Code | दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आणि इतर शालेय विद्यार्थ्यांंना सुट्टी असल्याने अनेकजण देवदर्शनाला जाण्याचा विचार करतात. तुम्ही देखील देवदर्शनासाठी जात असाल तर योग्य कपडे परिधान करणे गरजेचे आहे. अनेक मंदिरांनी भाविकांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे.

पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मंदिर व्यवस्थापनाने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने अष्टविनायक गणपती मंदिरांपैकी 5 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू केला आहे. यामध्ये मोरगावचा मोरेश्वर (Morgaon Mayureshwar Temple), थेऊरचा चिंतामणी (Theur Chintamani Ganpati), सिद्धटेकचा सिद्धिविनायक (Siddhatek Siddhivinayak Temple), चिंचवडचा मोरया गोसावी संजीवनी मंदिर (Chinchwad Moraya Gosavi Temple) आणि खार नारंगी मंदिराचा (Khar Narangi Temple) समावेश आहे.

अष्टविनायक दर्शन (Ashtavinayak Yatra) हे महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. याच पार्श्वभूमीवर चिंचवड देवस्थान ट्रस्टने या पाच मंदिरांसाठी वस्त्रसंहिता जारी केली आहे.

चिंचवड देवस्थान ट्रस्टने याबाबत एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, “महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा आणि भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे. मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून आपले वर्तन आणि पेहराव असावा यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

ड्रेसकोडची (Maharashtra Temples Dress Code) नियमावली काय आहे?

ट्रस्टने जारी केलेल्या नियमांनुसार, पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करणे अपेक्षित आहे. यामध्ये शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पॅन्ट किंवा धोतर, कुर्ता पायजामा यांसारख्या वस्त्रांचा समावेश आहे. तर महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस (Traditional Indian Dress Code) किंवा इतर कोणतेही पारंपरिक आणि मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आदरयुक्त वस्त्र परिधान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अति आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके किंवा शरीरप्रदर्शन करणारे अनौपचारिक कपडे मंदिर परिसरात घालू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मंदिर प्रशासनाने या ड्रेसकोडच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ट्रस्टचे म्हणणे आहे की ही सक्ती नाही, तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती आहे.