वेंगुर्ला :रेडी येथील प्रसिद्ध श्री द्विभुज गणपती मंदिरात श्री गजानन संप्रोक्षण कलशारोहण सोहळा २६ ते २८ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री ढोल-ताशांच्या गजरात कलशाचे रेडी येथे गणपती मंदिरात आगमन झाले आहे या भव्यदिव्य सोहळ्यानिमित्त गावात उत्साहचे वातावरण आहे.
या सोहळ्याला येणाऱ्या भाविकांचेही जोरदार स्वागत करण्यात येते. रस्त्यारस्त्यावर रांगोळी काढण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही केली आहे. तर मंदिर परिरात विविध दुकाने थाटली आहेत. एकूण या रेडी गावात जत्रौत्सवाचे स्वरुप आले आहे. शुक्रवारी कलशाचे भव्य मिरवणूकीने मंदिरात आगमन झाले असून, तत्पूर्वी वेंगुर्ला शहरातील ग्रामदेवी श्री सातेरी व ग्रामदेव श्री रामेश्वर मंदिर परिसरात कलश नेऊन दोन्ही ठिकाणच्या देवतांना श्रीफळ ठेवण्यात आले. त्यानंतर बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक रेडी येथे जाण्यास मार्गस्थ झाली. रेडी हुडा ते गणपती मंदिर अशी ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. २८ ला हा कलशारोहण सोहळा होणार आहे. रेडी येथे हा भव्य दिव्य सोहळा अनेक धार्मिक आणि विविध कार्यक्रमांसह पार पडणार आहे.तीन दिवसांचा हा सोहळा या गावासाठी एक उस्तव असून, सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २८ रोजी शांतीपाठ, कलशारोहण, बलिदान, पूर्णाहूती, सामुदायिक गा-हाणे, आरती, स्थानिकांचे भजन असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेव गजानन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.