पालघर- शेकडो वर्षांची परंपरा असलेला पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जगदंबा (बोहाडा) उत्सव आजपासून सुरू झाला. खोडाळा शहरात सुरू झालेला हा पारंपरिक उत्सव ४ मे पर्यंत चालणार असून यंदा मात्र कुस्त्यांचा फड रद्द करण्यात आला आहे.
हा जगदंबा उत्सव बरीच वर्षे खंडित झाला होता. मात्र जुन्या जाणत्या मंडळींनी पुढाकार घेऊन हा उत्सव दोन वर्षांपूर्वी पुन्हा सुरू केला आहे. यंदाचे या उत्सवाचे तिसरे वर्ष आहे.
आज पहिल्या दिवशी श्री गजाननाचे विधिवत पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. उद्या ३ मे रोजी लहान बोहाडा आणि तिसर्या दिवशी म्हणजे ४ मे रोजी मोठा बोहाडा रात्रभर झाल्यानंतर ५ मे रोजी सकाळी ९ वाजता महापूजा, महिषासुर व देवीचे युद्ध आणि मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीनंतर होणारा कुस्त्यांचा फड यंदा रद्द करण्यात आला आहे. मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवात रात्रीच्यावेळी सोंगे नाचविली जातात. हा उत्सव राज्यातील प्रत्येक आदिवासी बहुल भागात साजरा केला जातो.