छत्रपती संभाजीनगर – शेताच्या बांधावर खेळत असलेल्या एका दहा वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला.ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथे घडली.
महेश सिद्धार्थ आखाडे असे या घटनेतील मृत मुलाचे नाव आहे.महिन्याभरातील ही दुसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कवीटखेडा परिसरातील गोरख काशिनाथ चव्हाण यांच्या गट नंबर १३३ शेतामध्ये मध्यप्रदेशातील परप्रांतीय कामगार कापूस वेचण्याचे काम करत होते. कामगाराचा मुलगा शेताच्या बांधावर खेळत होता. यावेळी शेजारील ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर हल्ला चढवत त्याला शेतात फरफटत नेले.मुलाच्या ओरडण्याच्या व रडण्याच्या आवाजाने कामगार मुलाला वाचविण्यासाठी धावले. शेजारी शेतात ट्रॅक्टरने काम सुरू होते.चालकाने तत्काळ ज्वारीच्या शेतात ट्रॅक्टर घातला.त्यामुळे बिबट्याने पळ काढला.मात्र,तोपर्यंत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता.