मुंबई – लोक अल्पोपहारासाठी येतात, तिथे हर्बल हुक्का किंवा कोणत्याही हुक्क्याला आपोआप परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत मुंबई न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेने घेतलेला निर्णय कायम ठेवत रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर चालवण्यास मनाई केली.
हॉटेल व्यावसायिक सायली पारखी यांनी आपल्या रेस्टॉरंटमध्येच हर्बल हुक्का पार्लर सुरू केले होते. मुंबई महानगरपालिकेने जिथे खाण्याचा संबंध आहे, तिथे हुक्का पार्लर चालवण्यास मनाई केली. याविरोधात व्यावसायिका पारखी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेने घेतलेला निर्णय कायम ठेवत रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर चालवण्यास मनाई केली.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आर. एन. लोढा आणि जी. एस. कुलकर्णी यांनी याबाबत याचिका कर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट शब्दात नमूद केले की, ज्या ठिकाणी खाण्याचा संबंध आहे, लोक अल्पोपहारासाठी येतात, तिथे हर्बल हुक्का किंवा कोणताही हुक्क्याला आपोआप परवानगी मिळाली असे होऊ शकत नाही. एकदा एखाद्याला याबाबत हुक्का हर्बल सुरू करायला परवानगी दिली तर, अनियंत्रित रीतीने अशी पार्लर सुरू होतील आणि त्यावर नियंत्रण ठेवणे मुश्किल होईल. याशिवाय उच्च न्यायालयाने आपल्या आदेश पत्रामध्ये हे देखील म्हटले आहे की, कोणत्याही उपहारगृहामध्ये हुक्का पार्लर चालू शकत नाही.