ईशान्य भारतात दूर कुठेतरी एका निर्जन जंगलात लपलंय एक रहस्य… रहस्य ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचं… चार हात आणि बाहेर येणारे तीन दात असलेला गणपती…भव्य दिव्य शंकर…दुर्गा देवी अशा अनेक मूर्ती इथे दगडांमध्ये कोरलेल्या आहेत. या मूर्ती कोणी बनवल्या? कधी बनवल्या? का बनवल्या आणि मुख्य म्हणजे एक कोटी पूर्ण व्हायला एकच मूर्ती कमी का पडली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नाहीत.उनाकोटी म्हणजे कोटीला एक कमी…त्यामुळे ही जागा उनाकोटी म्हणून प्रसिद्ध झाली. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या रहस्यांमध्ये या जागेची गणना केली जाते.
उनाकोटी हे त्रिपुराची राजधानी आगरतळापासून सुमारे १४५ किलोमीटर अंतरावर आहे.कित्येक वर्ष ही जागा कोणालाच माहीत नव्हती… पण एक दिवस अचानक या जागेचा शोध लागला आणि या मूर्तींमागचे रहस्य शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. जंगलातील या रहस्यमयी उनाकोटी जागेबाबत अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
कालू नावाचा एक कुशल कारागीर होता. त्याला भगवान शंकर आणि माता पार्वतींसोबत कैलास पर्वतावर जायचे होते.पण ते शक्य नव्हते.आपल्या भक्ताचे मन मोडायचे नाही म्हणून भगवान शंकर कालूला म्हणाले की,तू जर एका रात्रीत एक कोटी देवी-देवतांच्या मूर्ती बनवल्या तर तुला आम्ही सोबत घेऊन जाऊ.कालूने हे आव्हान स्वीकारले आणि तहान भूक विसरून रात्रभर मोठमोठ्या खडकांपासून मू्र्ती बनवत राहिला. कालूच्या हातून ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मू्र्ती तयार झाल्या. त्याने मूर्ती मोजायला घेतल्या तेव्हा त्याच्या लक्षात आले कोटीला एक मूर्ती कमी आहे. तो एक शेवटची मूर्ती तयार करायला घेणार इतक्यात सूर्यदेवाने दर्शन दिले आणि एक कोटीतील एक मूर्ती कमी राहिली. भगवान शंकराचे आव्हान पूर्ण न करू शकल्याने कालूला सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत. कालू आणि त्याच्या मूर्ती तिथेच तशाच राहिल्या.
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, काशीला जाताना भगवान शंकर याच ठिकाणी एक रात्र थांबले होते. त्यांच्यासोबत ९९ लाख ९९ हजार ९९९ देवी-देवतादेखील प्रवास करत होते. आज रात्री आराम करून सूर्योदयापूर्वी उठून काशीला निघायचं असं शंकरांनी सर्वांना सांगितले.पण दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी भगवान शंकर सोडून इतर कोणालाही वेळेत जाग आली नाही. त्यावेळी क्रोधित शंकराने सगळ्यांना शाप देऊन दगड बनवले. तेव्हापासून ते उनाकोटीच्या जंगलात तशाच अवस्थेत आहेत, असं म्हणतात.