सोन्याचे दागिने देणारे \’धामापूर तलाव\’

तहानलेल्याची तहान भागवणारी,मोठमोठया गावांना पाणी पुरवणारी,काठावर पशुपक्षी आणि प्राण्यांना आसरा देणारी अनेक तलावं असतात… पण कधी सोन्याचे दागिने देणारे तलाव पाहिलेय का? ऐकून आश्चर्य वाटेल पण खरेच सोन्याचे दागिने देणारे तलाव मालवणमधील काळसे धामापूर या गावी आहे…

धामापूर तलावाच्या शेजारीच जवळजवळ पाचशे वर्षे जुने देवी भगवतीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराबाबत पिढ्यान् पिढ्या एक अद्भूत आख्यायिका गावात प्रचलित आहे. परडीतल्या दागिन्यांची आख्यायिका! गावातील कोणत्याही घरी लग्नकार्य असले पण आर्थिक अडचणींमुळे सोन्याचे दागिने घालण्याची परिस्थिती नसली की अशी कुटुंब देवीआईकडे मागणे मागयचे…आपल्या अंगणातून परडीभर फुले आणून देवीला वाहायचे.देवीला मनोभावे नमस्कार करून दिलेले दागिने पुन्हा परत करण्याची शपथ घ्यायचे आणि ती परडी तलावात सोडून द्यायचे…दुसऱ्या दिवशी सकाळी ती परडी पाण्यात तरंगत राहायची पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या परडीत फुलांच्या जागी चक्क सोन्याचे दागिने असायचे. हे दागिने वापरून झाले की लोक पुन्हा ते दागिने भरलेली परडी तलावात नेऊन सोडायचे…परडीतले हे दागिने कुठून येतात, कुठे जातात हे आजही न उलगडलेले कोडेच आहे. देवी गावकऱ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करते असे गावकरी मानतात.

आज धामापूर तलाव आणि देवी भगवतीचे मंदिर जरी तसेच असेल तरी परडीतल्या दागिन्यांची प्रथा मात्र बंद पडली. काही वर्षांपूर्वी गावातील एका व्यक्तीने सोन्याचे दागिने तलावातल्या परडीतून घेतले खरे परंतु पुन्हा तलावात आणून सोडले मात्र नाहीत… तेव्हापासून गावातील ही प्रथा बंद झाली… ज्याने दागिने चोरले तो पकडला गेला, त्याने चोरी कबूलही केली पण त्या दिवसापासून आजतागायत धामापूर गावात त्या कुटुंबाच्या वंशातील एकही व्यक्ती राहू शकलेली नाही असे येथील ग्रामस्थ सांगतात.

Scroll to Top