भूतांपासून वाचण्यासाठी ते तीन दिवस गावकरी गाव सोडून जातात- ‘मालवणातील गावपळण’

तो येतलो…गावात कोणीच थांबूचा नाय… जो थांबतलो तो जिवंत रव्हाचो नाय… (तो येणार… गावात कोणीच थांबायचे नाही… जो थांबेल तो जिवंत राहणार नाही…) या एकमेव भीतीपोटी मालवणातील चिंदर, आचरा, शिरोडे, वायंगणी, मुगणे इत्यादी गावातील गावकरी तीन दिवस स्वत:च्या घरातूनच बाहेर पडतात. पण नेमके कोण येत आणि त्याला नक्की काय पाहिजे असते. गावकरी त्याला इतके का घाबरतात… नक्की हा प्रकार आहे तरी काय? गेली कित्येक वर्षे सुरु असलेल्या एका आगळ्यावेगळ्या परंपरेचे नाव आहे गावपळण…

या गावांमध्ये दर तीन वर्षांनी तीन दिवसांसाठी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक गाव सोडून जातात.. यालाच गावकरी गावपळण असे म्हणतात. या तीन दिवसांत गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक माणूस गावातून बाहेर पडतो. इतकेच नव्हे तर गावातील सर्व पाळीव प्राणीदेखील यावेळी ते स्वतः सोबत वेशी बाहेर नेतात. या तीन दिवसांत त्या गावात जे कोणी पाऊल टाकेल ते जिवंत राहणार नाही असे लोक म्हणतात. या तीन दिवसात भूतं गावभर थयथयाट करतात. सर्वत्र स्वतःचे साम्राज्य निर्माण करतात. त्यामुळे ते तीन दिवस गाव भुतांच्या ताब्यात असते. त्यांच्या साम्राज्यात इतर कोणाचेही वास्तव्य ते खपवून घेऊ शकत नाहीत. एखादा माणूस भुतांच्या कचाट्यात सापडला तर भूत त्याच्या शरीराचा ताबा घेते आणि त्याला वाट्टेल ते करायला लावते,असे गावकऱ्यांचे मानणे आहे. त्यामुळे गावकरीदेखील या तीन दिवसांत स्वत:च्या राहत्या घरी पाय ठेवायची हिंमत करत नाहीत. संपूर्ण गावचे गाव हे तीन दिवस वेशीबाहेर राहते. प्रत्येक गावकरी आपल्या जीव वाचवण्यासाठी प्रार्थना करत असतो, वेशीबाहेर अखंड मंत्रजाप सुरु असतो.

गाव पळवणच्या या प्रथेमागे मालवणमधील भूतांच्या लढाईची शंभर वर्षांहून अधिक जुनी गोष्ट प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, इथे त्याकाळी एक राजा राज्य करत होता… हा राजा सरपंचाच्या मुलीवर मोहित झाला व त्याने त्या मुलीला राजमहालात आणण्यासाठी गावात सैनिक पाठवले. राजाच्या या वागण्याने गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी आपली मुलगी राजाला देण्यास नकार दिला. त्यानंतर राजाचे सैनिक आणि गावकरी यांच्यात युद्ध झाले, हे युद्ध तीन दिवस चालले. या युद्धात राजाचे अनेक सैनिक आणि गावकरीदेखील मारले गेले. या युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांचे आणि गावकऱ्यांचे अतृप्त आत्मे या तीन दिवसांत गावात येतात असे म्हणतात.

Scroll to Top