Varun Aaron Retirement: भारताचा वेगवान गोलंदाज वरूण अॅरॉनने (Varun Aaron) क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. सातत्याने होणाऱ्या दुखापतीमुळे त्याने हा निर्णय घेतला. दुखापतीमुळे त्याला वारंवार संघाबाहेर राहावे लागले. त्यामुळे त्याने आता निवृत्ती घेत असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली. 17 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर वरूणने हा निर्णय घेतला.
वरूणने (Varun Aaron Retirement) भारतासाठी 2015 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो नियमितपणे देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. विजय हजारे ट्रॉफीमध्येही तो झारखंड संघाकडून क्रिकेट खेळत होता. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून झारखंडचा संघ बाहेर पडल्यानंतर वरूणने (Varun Aaron Retirement) निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
वरूण अॅरॉनची कामगिरी
वरूणने (Varun Aaron Retirement) वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. ताशी 150 च्या वेगाने गोलंदाजी करणारे क्रिकेटपटू भारतीय संघात खूप कमी वेळा पाहायला मिळतात. त्यामुळे वरूणने सातत्याने वेगवान गोलंदाजी करत स्वतःचे स्थान निर्माण केले होते.
त्याने भारताकडून 9 कसोटी सामने खेळताना 18 विकेट्स घेतले. तर 9 एकदिवसीय सामन्यात 11 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये विविध संघाकडून खेळताना त्याने 52 सामन्यांमध्ये 44 विकेट्स घेतल्या. तसेच, त्याने 66 प्रथम श्रेणी आणि 87 लिस्ट-ए क्रिकेट सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 173 आणि 141 विकेट घेतल्या.