जसप्रीत बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? महत्त्वाची माहिती आली समोर

IPL 2025 | आयपीएलच्या नवीन सीझनला आजपासून (22 मार्च) सुरुवात होत आहे. मात्र, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर टॉफी स्पर्धेपासूनच बुमराहला दुखापतीचा सामना करावा लागत आहे. तो दुखापतीतून अद्याप बरा झालेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या काही सामन्यात तो मैदानावर खेळताना दिसणार नाही.

बुमराह (Jasprit Bumrah Injury Updates) काही दिवसांपूर्वीच बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) येथे आला होता. तो आयपीएल 2025 मध्ये खेळण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, बुमराह आणि मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) सकारात्मक चिन्हे दिसत आहे.

बुमराह मागील आठवड्यात देखील एनसीएला आला होता. यावेळी त्याला गोलंदाजीदरम्यान वेदना जाणवली. त्यानंतर, NCA व्यवस्थापनाने त्याला विशिष्ट व्यायाम करण्याचा सल्ला दिला आणि नंतर परत येण्यास सांगितले होते. 

बुमराला गोलंदाजी करताना कोणतीही समस्या न जाणवल्यास NCAकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. NCA कडून परवानगी मिळाल्यानंतरच तो आयपीएलमध्ये खेळू शकतो. 

मात्र, यासाठी किमान एक आठवडा लागण्याची शक्यता असून, त्यामुळे तो मुंबई इंडियन्सकडून पहिले दोन सामने खेळू शकणार नाही.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्ज आणि दुसरा सामना 29 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. बुमराह एक आठवड्यात फिट झाल्यास तो 31 मार्चला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या घरच्या सामन्यासाठी मैदानात पुनरागमन करू शकतो. दरम्यान, मुंबई इंडियन्सने बुमराहला 18 कोटी रुपये मोजून संघात रिटेन केेले आहे. तो संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते देखील त्याच्या मैदानावर परतण्याची वाट पाहत आहेत.