IPL 2025 | आयपीएल 2025 स्पर्धेच्या (IPL 2025) तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा (CSK vs MI) 4 विकेट्सने पराभव केला. रचिन रविंद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने मुंबईचा पराभव केला. मात्र, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा युवा फिरकीपटू विग्नेश पुथूरने (Vignesh Puthur) सर्वांचे लक्ष वेधले. मुंबई इंडियन्सकडून खेळताना विग्नेशने शानदार कामगिरी करत चेन्नईच्या 3 खेळाडूंना बाद केले.
आयपीएलच्या (IPL 2025) पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करत हा 23 वर्षीय खेळाडू चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांच्या पहिल्या सामन्यात २3 वर्षीय विग्नेश पुथूरवर विश्वास ठेवला आणि रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून त्याला IPL पदार्पणाची संधी दिली. या युवा गोलंदाजाने त्या विश्वासाला पूर्णपणे पात्र ठरला.
डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या विघ्नेशने या सामन्यात दमदार कामगिरी किली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या आक्रमक फलंदाज शिवम दुबेला देखील बाद केले. याशिवाय, दीपक हुड्डाची विकेट देखील स्वतःच्या नावावर केली. या सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देत 3 विकेट्स घेतले.
कोण आहे विग्नेश पुथूर? (Who is Vignesh Puthur?)
23 वर्षीय विग्नेश पुथूर (Vignesh Puthur) फिरकीपटू आहे. केरळच्या मल्लपुरमचा रहिवासी असलेल्या पुथूरने 11 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पुथूरचे वडील ऑटो रिक्षा चालक आहेत.
त्याच्या थोड्या अपारंपरिक गोलंदाजी शैलीमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. तो केरळ क्रिकेट लीगच्या उद्घाटन सत्रात अॅलेप्पी रिपल्स संघाचा भाग होता.पुथूरने त्या स्पर्धेत फक्त तीन बळी घेतले, पण तरीही मुंबई इंडियन्सच्या स्काउट्सचे लक्ष त्याच्याकडे गेले.
मुंबईने त्याच्यातील क्षमता बघून त्याला ट्रायलसाठी आमंत्रित केले. विग्नेशने अद्याप देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळचे प्रतिनिधित्व केलेले नाही. परंतु, त्याआधीच आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. मुंबईने त्याला 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये खरेदी केले होते.