Danish Kaneria : ‘हिंदू असल्याचा अभिमान’, पहलगाम हल्ल्यानंतर पाकच्या माजी क्रिकेटपटूने स्वतःच्याच देशाच्या पंतप्रधानांवर साधला निशाणा

Danish Kaneria on Pahalgam Terror Attack

Danish Kaneria on Pahalgam Terror Attack | पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने (Danish Kaneria) काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर थेट निशाणा साधला आहे. या हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, यानंतरही पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी अद्याप स्पष्ट निषेध केला नसल्याबद्दल कनेरियाने नाराजी व्यक्त केली.

‘एक्स’ (ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये कनेरियाने म्हटले, “जर या हल्ल्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नसेल, तर पंतप्रधानांनी आतापर्यंत निषेध का केला नाही? सैन्य अचानक अलर्टवर का आहे? कारण तुम्हाला सत्य माहीत आहे — पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना संरक्षण देतो.”

कनेरियाच्या या वक्तव्यावर एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटले, “तू भारतीयांपेक्षा जास्त भारतीय वाटतोस.” त्यावर उत्तर देताना कनेरियाने ठामपणे सांगितले, “मी हिंदू आहे – आणि याचा अभिमान आहे. मी ज्या देशात जन्मलो, त्याची सेवा केली. पण पाकिस्तानने फाळणीपासून आजपर्यंत हिंदूंवर अन्याय केला आहे, आणि मला त्यातून वेगळी वागणूक मिळाली नाही.”

दरम्यान, पहलगामजवळील बैसारन भागात झालेल्या या हल्ल्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. केंद्रीय तपास संस्थांच्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या छुप्या गट The Resistance Front (TRF) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध झाला. अनेक देशांचे नेते, खेळाडू आणि उद्योगजगतातील मान्यवरांनी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतातील राजकीय नेत्यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.