IPL 2025 Rule Change | आयपीएलचा (IPL 2025) नवीन सीझन शनिवारपासून (22 मार्च) सुरू होत आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार आहे. त्याआधी बीसीसीआयकडून काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
बीसीसीआयकडून दरवर्षी नवीन सीझनआधी काही नवीन नियम (IPL 2025 New Rules) आणले जातात. यावेळीही बोर्डाने नवीन नियम बनवले आहे. बीसीसीआयने बईतील क्रिकेट सेंटरमध्ये कर्णधार आणि व्यवस्थापकांच्या बैठकीदरम्यान या नवीन नियमांबाबत माहिती दिली.
बीसीसीआयने (BCCI) चेंडूला चमकवण्यासाठी लाळ वापरण्यावर लावलेली बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता गोलंदाज चेंडू चमकवण्यासाठी लाळ वापरू शकतील. कोविड-19 महामारीच्या काळात लाळ वापरण्यावर निर्बंध घालण्यात आला होता. मात्र, आता यावरील बंदी हटवण्यात आली आहे. अनेक गोलंदाजांनी याबाबत मत मांडले होते. त्यानंतर आता आयपीएल ही पहिली मोठी स्पर्धा ठरणार आहे, ज्यात लाळ वापरण्यावर लावलेली बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, या वेळी आयपीएलमध्ये दोन चेंडूंचा वापर केला जाणार आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात नवीन चेंडू वापरण्यात येईल. हा नियम 11व्या षटकानंतर लागू होणार आहे. यामागचा उद्देश दवाचा प्रभाव कमी करणे आहे. दवामुळे नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होतो. हा नवा नियम टॉस जिंकणाऱ्या संघाला मिळणाऱ्या फायद्याला आळा घालण्यासाठी आणण्यात आला आहे.
याशिवाय, इम्पॅक्ट प्लेयरबाबतही अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये हा नियम लागू राहणार आहे.