Ayush Mhatre: यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडणारा आयुष म्हात्रे कोण आहे?

सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतून अनेक युवा क्रिकेटपटू आपले कौशल्य दाखवत आहेत. यापैकीच सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले एक नाव म्हणजे 17 वर्षीय युवा क्रिकेटपटू आयुष म्हात्रे (Ayush Mhatre). या युवा क्रिकेटपटूने यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

विजय हजारे ट्रॉफी 2024-25 च्या मुंबई विरुद्ध सौराष्ट्र संघाच्या सामन्यात आयुषने (Ayush Mhatre) मुंबईकडून खेळताना 148 धावांची खेळी केली. त्याआधी नागालँडविरुद्धच्या सामन्यात आयुषने 117 चेंडूत 181 धावांची खेळी केली. यासोबतच तो लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 150 पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर होता.

आयुष देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सातत्याने धावा करत आहे. त्याच्या या कामगिरीने चेन्नई सुपर किंग्सचे देखील लक्ष वेधले होते. आयपीएलच्या लिलावापूर्वी सीएसकेकडून त्याला ट्रायलसाठीही बोलण्यात आले होते.

कोण आहे आयुष म्हात्रे?

आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) यांचा जन्म 16 जुलै 2007 रोजी झाला. अवघ्या 17 वर्षाचा आयुष स्थानिक स्पर्धांमध्ये मोठी खेळी करताना दिसतो. रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्ध नाबाद 176 धावांची खेळी करत, त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. 2024 च्या इराणी ट्रॉफीदरम्यान म्हात्रेने मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 6 प्रथम श्रेणी सामन्यातच 40.09 च्या सरासरीने 441 धावा केल्या. तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 6 सामन्यांमध्ये 310 धावा केल्या आहेत.