Arsheen Kulkarni : 19 वर्षाच्या पोराची कमाल, महाराष्ट्रासाठी पहिल्याच सामन्यात ठोकले शतक

Arsheen Kulkarni Century : महाराष्ट्राचा युवा क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णीने (Arsheen Kulkarni) लिस्ट-ए क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे. सध्या विजय हजारे ट्रॉफी 2024-25 (Vijay Hazare Trophy) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात पंजाबविरुद्धच्या महाराष्ट्राकडून खेळताना अर्शिनने शतकी खेळी केली आहे. या सामन्यात 19 वर्षीय अर्शिनने 14 चौकारांसह 137 चेंडूमध्ये 107 धावा करत संघाला 275 धावांपर्यंत पोहोचवले.

अर्शिनने (Arsheen Kulkarni) यापूर्वी महाराष्ट्राच्या संघाकडून प्रथम श्रेणी आणि टी-20 क्रिकेट सामने खेळले आहेत. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील हा त्याचा पहिलाच सामना होता. पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी करत अर्शिन चर्चेत आला आहे.

कोण आहे अर्शिन कुलकर्णी?

दमदार कामगिरी करत चर्चेत येण्याची अर्शिनची (Arsheen Kulkarni) ही पहिलीच वेळ नाही. अंडर-19 वर्ल्ड कप 2024 मध्ये देखील या अष्टपैलू खेळाडूने भारतीय संघासाठी जबरदस्त कामगिरी केली होती. अर्शिनचा जन्म 15 फेब्रुवारी 2005 ला सोलापूर येथे झाला आहे. तो डाव्या हाताने फलंदाजी करण्यासोबतच मध्यम वेगवान गोलंदाजी देखील करतो. त्याच्या कामगिरीमुळे त्याला भारताचा दुसरा हार्दिक पांड्या देखील म्हटले जाते.

एमपीएलमध्ये देखील शतकी खेळी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे आयपीएल फ्रेंचाइजी लखनऊ सुपर जाइंट्स त्याला लिलावात खरेदी केले होते.