23 फेब्रुवारीला रंगणार भारत vs पाकिस्तान महामुकाबला, दोन्ही संघांचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड कसा आहे?

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत भारताने विजयी मोहिमेला सुरुवात केली आहे. भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला , 23 फेब्रुवारी रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाईल. या सामन्यापूर्वी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दुबईतील ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊया.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील रेकॉर्ड भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना 

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दोन्ही संघाचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड पाहता यात पाक वरचढ असल्याचे पाहायला मिळते. या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये पाच सामने झाले असून, त्यापैकी पाकिस्तानने तीन विजय मिळवले आहेत.

पाकने 2017 ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. याच स्पर्धेतील गट फेरीत भारताने पाकचा पराभव केला होता. मात्र, अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

दोन्ही संघांचा दुबईमधील रेकॉर्ड

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 28 वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पाकिस्तानने 19 वेळा विजय मिळवला आहे, तर भारताने 9 सामने जिंकले आहेत. 

भारत विरुद्ध पाकिस्तानचा आतापर्यंतचा वनडेमधील रेकॉर्ड

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना 1978 मध्ये खेळवला गेला. त्यानंतर या दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एकूण 135 वनडे सामने खेळले आहेत. यामझ्ये पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत, तर भारताने 57 सामने आपल्या नावावर केले आहेत. दोन्ही संघांदरम्यान पाच सामने अनिर्णीत राहिले आहेत.