Shubman Gill : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला (ICC Champions Trophy 2025) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला 23 फेब्रुवारीला पार पडणार आहे. मात्र, त्याआधी आयसीसीची नवीन क्रमवारी समोर आली आहे. वनडे फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिलने अव्वल स्थान गाठले आहे.
वनडे क्रमवारीत शुभमन गिल (Shubman Gill) सध्या क्रमांक-1 चा खेळाडू ठरला आहे. गिलने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला मागे टाकले.
इंग्लंडविरुद्ध देशात खेळलेल्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन डावांत 87, 60 आणि 112 अशा धावा केल्या. त्याने 86.33 च्या सरासरीने एकूण 259 धावा केल्या. या कामगिरीचा त्याला आयसीसी वनडे क्रमवारी अव्वल स्थान गाठण्यास मदत झाली आहे. याआधी 2023 च्या वनडे विश्वचषकादरम्यान हे स्थान मिळवले होते.
भारतीय सलामीवीर शुभमन गिलने 796 पॉइंटसह पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे, तर बाबर आझम 773 पॉइंटसह दुसऱ्या स्थानी आहे. तर या यादीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील तिसऱ्या स्थानी आहे.
तर गोलंदाजीमध्ये श्रीलंकेच्या महीष तीक्षणाने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने अफगाणिस्तानच्या रशीद खानला मागे टाकत पहिले स्थान गाठले आहे.