ठाणे- खुशी गिरीची भेदक गोलंदाजी, पूनम राऊत आणि श्वेता कलपथी या सलामीच्या जोडीने केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळे दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने एमआयजी क्रिकेट क्लबचा १० फलंदाज राखून दणदणीत पराभव करत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या ४० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. एमआयजी क्रिकेट क्लबला १३६ धावांवर गुंडाळल्यावर बिनबाद १३७ धावा करत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने अर्जुन मढवी करंडकावर आपल्या नावाची मोहोर उमटवली.
या निर्णायक लढतीत एमआयजी क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. महेक मिस्त्री, रिया दोषी, हिर कोठारी आणि मिताली म्हात्रेने छोट्या खेळीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबला सव्वाशे धावांचा पल्ला पार करता आला. मेहेकने सर्वाधिक २४, मिताली आणि हिरने प्रत्येकी१६, रिया दोशीने १५ धावा केल्या. फलंदाजांना दडपणाखाली ठेवताना खुशी चार बळी मिळवले. अदिती सुर्वे आणि पूनम राऊतने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. त्यानंतर पूनम आणि श्वेताने प्रतिस्पर्धी गोलंदाज निर्विवाद वर्चस्व गाजवत २० व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विजय निश्चित केला. श्वेताने ५५ चेंडूत ७६ धावा करताना ११ चौकार आणि दोन षटकार ठोकले. पूनमने नाबाद ४५ धावा बनवल्या.