विराट कोहलीच्या फिटनेसबाबत महत्त्वाची माहिती आली समोर, दुखापतीबाबत माहिती देताना शुभमन गिल म्हणाला…

Virat Kohli: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. गुडघ्याच्या दुखापतीमुळे विराट कोहलीला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यातही तो खेळणार की नाही? याबाबत अद्यापही प्रश्न आहे. मात्र, भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) विराट कोहलीच्या फिटनेसबाबत चिंता दूर केली आहे. त्याने स्पष्ट केले की, कोहली पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी उपलब्ध असेल.

कोहलीच्या उजव्या गुडघ्याला सूज असल्याने नागपूरमध्ये झालेला पहिला वनडे सामना खेळता आला नव्हता. आता त्याच्या फिटनेसबाबत माहिती समोर आली असून, तो इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

विराट कोहलीच्या दुखापतीबाबत माहिती देताना शुभमन गिलने सांगितले की, कोहलीची दुखापत  गंभीर नाही. तो सराव सत्रात पूर्णपणे ठीक होता, पण मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याच्या गुडघ्यात सूज आल्याचे आढळले. तो नक्कीच दुसऱ्या वनडे सामन्यासाठी मैदानात परत येईल.

दरम्यान, पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा पराभव करत भारताने सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. या सामन्यात शुभमन गिलच्या 87 धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडचा 4 विकेट राखून पराभव केला. या सामन्यात श्रेयस अय्यरने 59 धावा आणि अक्षर पटेलने 52 धावांची खेळी केली. दोन्ही संघांमधील दुसरा वनडे सामना 9 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.