Varun Chakravarthy: भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या (Ind vs Eng) तिसऱ्या T20 सामन्यामध्ये शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरीही वरूणच्या कामगिरीचे कौतुक करत आहे. त्याच्या कामगिरीसाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कारही मिळाला. मात्र, त्याच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
वरुण चक्रवर्ती हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला गोलंदाज ठरला आहे, ज्याने दोन वेळा 5 विकेट घेण्याची कामगिरी केली व त्यात त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 24 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. परंतु, या सामन्यात भारतीय संघाला 26 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
यापूर्वीही वरूणने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 17 धावा देत 5 विकेट्स घेतले होते. याही सामन्यात भारतीय संघाचा 5 विकेट्सने पराभव झाला होता. त्यामुळे दोनदा 5 विकेट्स घेतल्यानंतरही संघाचा पराभव झाल्याचा विक्रम वरूणच्या नावावर झाला आहे.
तिसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 171 धावा केल्या. तर भारतीय संघ 20 षटकांत 9 बाद 146 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात भारतीय संघाचा 26 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतरही भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.