U19 Women T20 World Cup 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचा पराभव करत आयसीसी अंडर 19 गटातील महिला टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. मलेशियाची राजधानी कुआलालंपुर येथे रंगलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताच्या युवा महिला खेळाडूंनी सलग दुसऱ्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. 2023 च्या टी-20 वर्ल्ड कपचा विजेता देखील भारतीय संघ ठरला होता.
टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्स राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 82 धावांवर गारद झाला. भारतीय गोलंदाजांसमोर आफ्रिकेच्या महिला खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून मिके व्हॅन वुर्स्टने सर्वाधिक 23 धावा, जेम्मा बोथाने 16 आणि फेय काउलिंगने 15 धावा केल्या. तर भारताकडून गोंगडी त्रिशाने 3 विकेट्स शानदार कामगिरी केली. याशिवाय, वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतलेल्या भारतीय महिला खेळाडूंनी अवघ्या 11.2 ओव्हरमध्ये फक्त एक विकेट गमावत लक्ष्य गाठले. भारताकडून सलामीवीर गोंगडी त्रिशाने 33 चेंडूमध्ये 8 चौकारांसह सर्वाधिक 44 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिच्याशिवाय, सानिका चाळकेने नाबाद 26 धावांची खेळी करत विजयात योगदान दिले.