AB de Villiers: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि धमाकेदार फलंदाज एबी डिव्हिलियर्सला (AB de Villiers) मिस्टर 360 नावाने ओळखले जाते. डिव्हिलियर्सला मैदानावर खेळताना पाहणे ही चाहत्यांसाठी परवनीच असते. त्याने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच, तो टी-20 लीग्समध्ये ही खेळताना दिसत नाही. मात्र, आता त्याने पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
डिव्हिलियर्स गेल्या 2 वर्षांपासून लीग क्रिकेटपासून दूर आहे. त्याने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, आता एक पॉडकास्टमध्ये बोलताना पुनरागमन करणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएलमध्ये (IPL) खेळताना दिसणार नाही.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “कदाचित मी पुन्हा एकदा क्रिकेट खेळेल. याबाबत अजून कोणतीही खात्री नाही, पण मला असं वाटू लागलं आहे. माझी मुलं माझ्यावर दबाव टाकत आहेत. मला वाटतं मी त्यांच्यासोबत नेट्सवर जाऊ शकतो. जर मला त्यात आनंद वाटला तर कदाचित मी पुन्हा कुठेतरी अनौपचारिक क्रिकेट खेळण्याचा विचार करेन. पण आयपीएल किंवा दक्षिण आफ्रिकेकडून असे व्यावसायिक मात्र नसेल.
एबी डिव्हिलियर्सने पुन्हा एकदा मैदानावर उतरण्याचे संकेत दिल्याने त्याचे चाहते देखील आनंदी झाले आहेत. त्याने आयपीएलमध्ये अनेकदा तुफानी खेळी केली आहे. एबी डिव्हिलियर्सने IPL मध्ये 184 सामन्यांच्या 170 डावांमध्ये 39.70 च्या सरासरीने 5162 धावा केल्या आहेत. यामध्ये 40 अर्धशतकं आणि 3 शतकांचा समावेश आहे.