निवृत्तीनंतरही राहुल द्रविडचे क्रिकेटप्रेम कायम, मुलासोबत फलंदाजीसाठी उतरला मैदानात

Rahul Dravid : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड  52 वर्षांचा झाला आहे, तरी क्रिकेटबद्दलचे त्याचे प्रेम अजूनही तसेच. क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी संधी मिळेल तेव्हा द्रविड फलंदाजीसाठी मैदानावर उतरताना पाहायला मिळतो.

द्रविडची दोन्ही मुलं त्याच्याच मार्गावर चालत क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. मुलगा अन्वयसाठी द्रविड पुन्हा एकदा मैदानात फलंदाजीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले, मात्र तो पुन्हा मैदानात उतरल्याने याची विशेष चर्चा होत आहे.

द्रविड मुलगा अन्वयसोबत विजय क्रिकेट क्लब (मालूर) कडून नासूर मेमोरियल शिल्डसाठी तिसऱ्या विभागातील (गट I) सामन्यात फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या द्रविडने 8  चेंडूंमध्ये एक चौकारासह 10 धावा केल्या.

अन्वयने शानदार फलंदाजी करत 60 चेंडूंमध्ये आठ चौकारांसह 58 धावा फटकावल्या. विजय संघाने सात गडी गमावून 345 धावा केल्या. स्वप्निलने संघासाठी सर्वाधिक धावा करत 50 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि चार षटकारांसह 107 धावा ठोकल्या. 

द्रविडप्रमाणे त्याचा मुलगा अन्वय देखील यष्टीरक्षक-फलंदाज आहे आणि कर्नाटकसाठी क्रिकेटमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आहे. 2023-24 मध्ये झालेल्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये त्याने कर्नाटक संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. अंडर-16 स्पर्धेत त्याने पाच सामन्यांत 45 च्या सरासरीने 357 धावा केल्या होत्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश होता. 

विजया क्रिकेट क्लबकडून खेळताना अन्वय अंडर-14 राज्य लीग स्पर्धेतही सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. अन्वय हा यष्टीरक्षक-फलंदाज आहे, तर राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित हा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे.