तिलक वर्माच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, विराट कोहलीला मागे टाकत ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 2 विकेट्स राखून भारतीय संघाने विजय मिळवला. भारताच्या विजयात तिलक वर्माने (Tilak Verma) महत्त्वाची भूमिका बजावली. एकीकडे एकमागोमाग एक खेळाडू आउट होत असताना तिलक वर्माने 72 धावांची वेगवान खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यासोबतच, त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

सलग 4 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नाबाद राहत सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी तिलकने केली आहे. त्याने मागील 4 टी20 सामन्यांमध्ये 107, 120, 19 आणि 72 धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे, त्याने सलग 4 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नाबाद राहत 318 धावा केल्या आहेत. यासोबतच, त्याने विश्व विक्रम केला आहे.

याआधी 4 टी20 सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या मार्क चॅपमनच्या नावावर होता. त्याने 4 सामन्यात 271 धावा केल्या होत्या. याशिवाय, तिलक हा नाबाद राहत टी20 सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू देखील ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.

विराट कोहली (258 धावा), संजू सॅमसन (257 धावा) आणि रोहित शर्मा (253 धावा) यांनी नाबाद राहत सर्वाधिक धावा केल्या होत्या. आता हा विक्रम तिलकच्या नावावर झाला आहे. दरम्यान, भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात तिलकने 55 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.