Champions Trophy India Squad 2025: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. मात्र, त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बुमराहला गेल्या महिन्यात सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीदरम्यान पाठीला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप बरा झालेला नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाल्यापासून बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता बीसीसीआयने बुमराह या स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या पाच वर्षांत ही दुसरी वेळ आहे, जेव्हा बुमराहला दुखापतीमुळे मोठ्या ICC स्पर्धेला मुकावे लागले आहे. यापूर्वी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये तो खेळू शकला नव्हता.
जसप्रीत बुमराहच्या जागी या स्पर्धेत आता 23 वर्षीय हर्षित राणाची निवड झाली आहे. तसे, यशस्वी जैस्वालच्या जागी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी मिळाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.