Jasprit Bumrah : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इतिहास रचला आहे. बुमराह सर्वोत्तम टेस्ट क्रिकेटपटू म्हणून बुमराहची निवड करण्यात आली होती. आता, ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ (ICC Men’s Cricketer of the Year ) पुरस्कार जिंकण्याची कामगिरी देखील त्याने केली आहे. दोन दिवसात दोन पुरस्कार जिंकण्याची कामगिरी त्याने केली आहे. ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकणारा बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, इंग्लंडचा जो रूट आणि हॅरी ब्रूक हे क्रिकेटपटू देखील पुरस्काराच्या शर्यतीत होते. मात्र, बुमराहने सर्वांना मागे टाकत प्रतिष्ठित सर गॅरफील्ड सोबर्स पुरस्कार (आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार) 2024 वर नाव कोरले आहे.
भारताकडून आजपर्यंत एकूण पाच खेळाडूंनी सर गारफील्ड सोबर्स पुरस्कार जिंकला आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने 2004 साली हा पुरस्कार पहिल्यांदा जिंकला. त्यानंतर 2010 मध्ये सचिन तेंडुलकर, 2016 ला रविचंद्रन अश्विन, 2017 आणि 2018 ला विराट कोहली आणि आता जसप्रीत बुमराहने हा पुरस्कार नावावर केला आहे.
2024 हे वर्ष बुमराहासाठी खास ठरले आहे. टी20 विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करत भारताला 11 वर्षांनी ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कसोटीमध्येही त्याने दमदार कामगिरी केली आहे. दुखापतीतून बरे होत बुमराहने सर्वोत्तम पुनरागमन केले. त्याने 2024 मध्ये 13 कसोटी सामन्यात 14.92 च्या सरासरीने तब्बल 71 विकेट्स घेतल्या. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी केली होती. याशिवाय, कसोटी क्रमवारीत सध्या तो अव्वल स्थानी आहे.