चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव का? जाणून घ्या कारण

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचा मुख्य आयोजक आहे. या स्पर्धेचे काही सामने पाकिस्तान, तर काही सामने दुबईमध्ये पार पडणार आहे. भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने दुबईमध्ये पार पडतील. आता आयसीसीच्या या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या जर्सीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये भारतीय जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिलेले आहे.

भारतीय जर्सीवर पाकिस्तानचे नाव असल्याने सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली आहे. याआधी भारताने पाकचे नाव जर्सीवर छापण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र, आता खेळाडूंच्या जर्सीवर पाकचे नाव असल्याचे समोर आले आहे.

भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव काय?

बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यासाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकने हायब्रिड मॉडेल स्विकारले. भारताचे सर्व सामने यूएईमध्ये  दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. भारताचे सामने दुबईत होणार असले तरीही पाकिस्तानच या स्पर्धेचा अधिकृत यजमान देश आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार  सर्व संघांच्या जर्सीवर स्पर्धेचा अधिकृत लोगो व अधिकृत यजमान देशाचे नाव असणे आवश्यक आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे जर्सीवर पाकिस्तानचे नाव आहे. फक्त भारतच नाही तर स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व 8 संघांच्या जर्सीवर ‘पाकिस्तान’चे नाव लिहिलेले आहे.