चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघात निवड होऊनही ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती

Marcus Stoinis: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला पुढील काही दिवसात सुरुवात होणार आहे. मात्र, त्याआधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे पॅट कमिन्स, जोश हेझलवूड हे खेळाडू दुखापतग्रस्त असताना आता एका महत्त्वाच्या खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा ऑल राउंड मार्कस स्टॉइनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच, यापुढे तो T20 क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. स्टॉइनिसची चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड देखील झाली होती. मात्र, आता त्याने निवृत्तीची घोषणा केल्याने ऑस्ट्रेलियन संघाला त्याच्याजागी इतर खेळाडू शोधावा लागणार आहे.

स्टॉइनिसने 2015 मध्ये पदार्पण केल्यानंतर 71 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 71 एकदिवसीय सामन्यात त्याने 26.7 च्या सरासरीने 1495 धावा केल्या आहेत. याशिवाय, 48 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

निवृत्तीची घोषणा करताना स्टॉइनिस म्हणाला की, ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणे हा एक अविस्मरणीय प्रवास होता. मला हिरव्या आणि सोनेरी जर्सीमध्ये खेळायला मिळालेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी अनमोल होता. माझ्या देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट राहील.

हा निर्णय घेणे सोपे नव्हते, पण मी विश्वास ठेवतो की, एकदिवसीय क्रिकेटमधून बाजूला होण्यासाठी आणि माझ्या कारकिर्दीच्या पुढच्या टप्प्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. माझे रॉन (अँड्र्यू मॅकडोनाल्ड) यांच्यासोबत उत्तम नाते आहे आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे, असेही तो पुढे म्हणाला.

दरम्यान, 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. त्याआधीच स्टॉइनिसने निवृत्ती घेतल्याने ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.