Ishan Kishan smashed his maiden IPL century | अपेक्षेप्रमाणे सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) संघाने IPL 2025 ची धमाकेदार सुरुवात केली आहे. मागील सीझनमध्ये या संघाच्या फलंदाजांनी गोलंदाजांना घाम फोडला. आता पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत 286 धावांचा डोंगर उभारला.
ही विक्रमी धावसंख्या उभारण्यामध्ये हैदराबादचा फलंदाज ईशान किशनची (Ishan Kishan) महत्त्वाची भूमिका होती. त्याने या सामन्यात तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले. ईशानने राजस्थानविरुद्ध केवळ 25 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, त्यानंतर आक्रमक फटकेबाजी करत अवघ्या 45 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.
या सामन्यात त्याने 47 बॉलमध्ये 6 षटकार आणि 11 चौकारांसह 106 धावा (Ishan Kishan Century) केल्या. शतक झळकवल्यानंतर ईशानने केलेल्या सेलिब्रेशनने देखील सर्वांचे लक्ष वेधले. प्रामुख्याने मागील वर्ष त्याच्यासाठी फारसे खास नव्हते. त्यामुळे त्याने कामगिरीद्वारे सर्वांना चोख प्रत्युत्तर दिल्याची चर्चा रंगली आहे.
IPL 2025 च्या मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने ईशान किशनला तब्बल 11.25 कोटी रुपये खर्चून संघात सामील केले होते. त्याआधी तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र, मुंबईच्या संघाने लिलावापूर्वी त्याला रिलीज केले होते.
ईशानने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2023 मध्ये खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी त्याची निवड झाली होती. मात्र, त्याने नाव मागे घेतल्याने बीसीसीआयच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून देखील बाहेर करण्यात आले. त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासही सांगण्यात आले होते. मात्र, तो त्यातही सहभागी झाला नाही. अखेर, त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हैदराबादने त्याला 11.25 कोटी रुपयात संघात सामील केले. आता हैदराबादकडून खेळताना पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकवण्याची कामगिरी केली.