Sayali Satghare : सध्या आयर्लंडचा महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघ (India women’s cricket team) आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा 6 विकेट्स राखून पराभव करत मालिकेत आघाडी घेतली.
या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असली तरी सर्वाधिक चर्चा या सामन्यात पदार्पण केलेल्या सायली सातघरेची (Sayali Satghare) होत आहे. 24 वर्षीय सायली सातघरेने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण केले. या सामन्यात तिने 10 ओव्हर्समध्ये 43 धावा देत 1 विकेट देखील घेतली. सायली सातघरे कोण आहे? त्याविषयी जाणून घेऊया.
कोण आहे सायली सातघरे (Sayali Satghare)?
कर्णधार स्मृती मंधनाने आज सायलीला भारतीय संघाची कॅप दिली. सायलीचा जन्म 2 जुलै 2000 रोजी झाला आहे. तिने बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये तिने चांगली कामगिरी केल्याने तिला आता भारतीय संघात स्थान मिळाले आहे. देशांतर्गत सामन्यामध्ये ती मुंबईच्या संघाकडून खेळते. तर डब्ल्यूपीएलमध्ये ती गुजरात जायंट्स संघाचा भाग आहे. ती उजव्या हाताने मध्यम वेगवान गोलंदाजी करते. तसेच, देशांतर्गत सामन्यात फलंदाजीचे कौशल्यही दाखवले आहे.
सायलीने (Sayali Satghare) आतापर्यंत 51 लिस्ट-ए सामने खेळले असून, यात तिने 20.81 च्या सरासरीने 666 धावा केल्या आहेत. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात तिने 100 धावांची नाबाद खेळी केली होती. याशिवाय, तिन्हे लिस्ट-ए सामन्यांमध्ये 56 विकेट्स देखील घेतल्या आहेत. अवघ्या 5 धावा देत 7 विकेट्स घेण्याची सर्वोत्तम कामगिरीही तिने केली आहे. तिने आतापर्यंत 49 सामन्यांमध्ये 19.05 च्या सरासरीने 37 विकेट्स घेतले आहेत.