अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

Abhishek Sharma Record: भारतीय युवा क्रिकेटपटू अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात आपल्या तुफानी फलंदाजीने इतिहास रचला. अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय, भारताकडून एका टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याची कामगिरी देखील त्याने केली आहे.

अभिषेकने इंग्लंडविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळताना अवघ्या 37 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करण्याची कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध एखाद्या खेळाडूने सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम अभिषेकच्या नावावर झाला आहे. याआधी एरोन फिंच आणि क्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध 47 चेंडूत शतक ठोकले होते.

याशिवाय, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून सर्वाधिक धावसंख्या करण्याची कामगिरी देखील त्याने केली. त्याने इंग्लंडविरुद्ध 57 चेंडूमध्ये 13 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 135 धावांची खेळी केली. ही भारतीय खेळाडूची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी आहे. याआधी शुभमन गिलच्या (नाबाद 126 धावा) नावावर हा विक्रम होता.

अभिषेक शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 13 षटकार ठोकण्याची कामगिरी केली. ही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध एका सामन्यात 10 षटकार ठोकले होते.

भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा

135 – अभिषेक शर्मा -इंग्लंड, वानखेडे (2025)

126 – शुभमन गिल- न्यूझीलंड, अहमदाबाद (2023)

123 – ऋतुराज गायकवाड- ऑस्ट्रेलिया, गुवाहाटी (2023)

122 – विराट कोहली- अफगाणिस्तान, दुबई (2022)

121 – रोहित शर्मा- अफगाणिस्तान, बंगळुरू (2024)

भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार:

13 – अभिषेक शर्मा – इंग्लंड, वानखेडे (2025)

10 – रोहित शर्मा – श्रीलंका, इंदूर (2017)

10 – संजू सॅमसन – दक्षिण आफ्रिका, डरबन (2024)

10 – तिलक वर्मा – दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग (2024)