..अन् रचिन रविंद्रच्या चेहऱ्यावर आदळला चेंडू, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान, व्हीडिओ व्हायरल

Rachin Ravindra Injured: सध्या न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांमध्ये ट्राय-सीरिज सुरू आहे. या सीरिजमधील पहिल्या वनडे क्रिकेट सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पार पडला. मात्र, या सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला. 

क्षेत्ररक्षण करताना रचिन रवींद्रच्या थेट चेहऱ्यावर बोल लागल्याने यात तो गंभीर जखमी झाला आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 38व्या षटकात पाकिस्तानी फलंदाज खुशदिल शाह याने स्लॉग-स्वीप फटका मारला. मायकेल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर मारलेला हा फटका डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या रचिनच्या थेट चेहऱ्यावर जाऊन आदळला.

https://twitter.com/FanCode/status/1888275544313118736

रचिन खुशदिल शाहचा झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला चेंडू दिसलाच नाही व चेंडू थेट चेहऱ्यावर लागल्याने तो जागीच कोसळला. कपाळाला चेंडू जोरात लागल्याने रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर तत्काळ त्याला मैदानाबाहेर न्यावे लागले. त्याच्या कपाळावर बर्फाचा पॅक ठेवून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी रचिनच्या दुखापतीसाठी पाकिस्तानला जबाबदार धरत आहेत. मैदानावरील अपुऱ्या लाइटमुळे रचिनला चेंडू दिसला नाही, असे म्हणत नेटकरी यासाठी पाकला जबाबदार धरत आहेत.

दरम्यान, ट्राय सीरिजमधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत 6 विकेट्स गमावत 330 धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान 47.5 ओव्हरमध्ये सर्वबाद 252 धावांपर्यंतच मजल मारू शकला.