अभिनेत्री जिया खानचा आज स्मृतिदिन. तिचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ न्यूयॉर्क येथे झाला. या खानचे मूळ नाव नफीसा रिजवी खान असे होते. वयाच्या १९ व्या वर्षी सुरू झालेले जियाचे करिअर २५ व्या वर्षी तिने संपवून टाकले. जिया खान ही एक ब्रिटिश-भारतीय अभिनेत्री होती. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली जिया खान मुंबईत आली ती हीरोइन बनण्यासाठी. तिची आई रबिया अमीन या ८० च्या दशकातली आग्रा, उत्तर प्रदेश येथील हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री होत्या.
जिया खानची आई राबिया अमिन यांनी पण बॉलिवुडमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुर्दैवाने त्यांना यश मिळाले नाही. मात्र, सर्व काही सोडून पती अली रिझवी खान यांच्यासोबत न्यूयॉर्क येथे शांततेत जगण्यासाठी गेलेल्या आईला मुलीच्या रूपाने पुन्हा या चंदेरी दुनियेत खेचून आणले. नफिसाने न्यूयॉर्कमधील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले होते. १९९८ मध्ये ‘दिल से’ चित्रपटात बाल कलाकाराच्या भूमिकेतून तिचा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर २००७ मध्ये अमिताभ यांच्यासोबत ‘नि:शब्द’मध्ये मुख्य भूमिका चालून आली आणि तिला आकाश ठेंगणे वाटू लागले. या चित्रपटातील भडक दृश्यांमुळे नफिसा खानला ‘सेक्स अपील’ असा मान मीडियाने दिला. या चित्रपटामुळे गाजलेले ‘जिया’ हे नाव नफिसाने पुढे कायमस्वरूपी धारण केले. तिच्या ऑनस्क्रीन आत्मविश्वासाचे, तिच्या लूकचे एवढे कौतुक झाले होते की तिला फिल्म फेअरच्या पुरस्कारांमध्ये पदार्पणासाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर २००८ सालच्या गजनीमध्ये देखील तिने काम केले होते. २००८ मध्ये आलेल्या ‘गजनी’नंतर जियाला चांगली भूमिका आणि चांगला चित्रपट मिळालाच नाही. दोन वर्षांनी साजिद खान यांच्या ‘हाऊसफुल्ल’मध्ये ती ‘चमकली’ मात्र शेवटचीच! ३ जून २०१३ रोजी जिया खानने आपल्या मुंबई येथील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३