कोलंबो – भारत आणि श्रीलंकेत झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने सात विकेट्सने जोरदार विजय मिळवला. श्रीलंकेने भारतासमोर 262 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने 36.4 षटकांत 3 विकेट गमावून पूर्ण केले. भारताचा कर्णधार शिखर धवनने या सामन्यात पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळले आणि नाबाद 86 धावा केल्या. त्याच्या या दमदार खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला. तर इशान किशनने 59, पृथ्वी शॉने 43 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा केल्या. भारताने हा सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.
दरम्यान, धवनने 86 धावांची खेळी करताना सहा चौकार आणि एक षटकार लगावला. याबरोबरच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा पार केला असून वेस्ट इंडिजचे सर विवियन रिचर्ड आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांना मागे टाकले आहे. तो 6 हजार धावा करणारा 13वा भारतीय खेळाडू बनला आहे. या यादीत भारताच्या सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, विरेंद्र सहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंह, सुरेश रैना आणि मोहम्मद अझहरुद्दीन या नावांचा समावेश आहे.
कालच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकांत 262 धावा केल्या. मग पृथ्वी शॉ (43 धावा, 24 चेंडू, 9 चौकार), शिखर धवन (नाबाद 86 धावा, 95 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार), ईशान किशन (59 धावा, 42 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार), मनीष पांडे (25 धावा, 40 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 31 धावा, 20 चेंडू, 5 चौकार) जोरावर हे आव्हान भारताने 36. 4 षटकांत 3 विकेट गमावून पूर्ण केले. तर श्रीलंकेकडून धनंजय सिल्वाने दोन गडी बाद केले आणि भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव व चहलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर आता दुसऱ्या एकदिवसीय सामना उद्या, 20 जुलैला खेळवण्यात येणार आहे.