संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

भारत ही संतांची भूमी असल्यामुळे हा देश शाश्वत – पंतप्रधान मोदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पिंपरी – श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत आले आहेत. आषाढी वारीसाठी तुकोबांच्या पालखीचे सोमवारी (२० जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, ‘आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंय की, मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे. यामध्ये संतांचा सहवास लाभला की ईश्वराचं दर्शन आपोआप होतं. देहूच्या पवित्र भूमित येण्याचं मला सौभाग्य लाभलं त्यामुळे मीदेखील याची अनुभूती घेतली आहे.

भाषणाला सुरुवात करताना मोदी म्हणाले की, ‘भगवान विठ्ठल आणि वाकऱ्यांना मी वंदन करतो. आज देहूच्या या पवित्र भूमिवर येण्याचे सौभाग्य लाभले असून, हे स्थळ तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमीदेखील आहे. देहूच्या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. भारत जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. देश आपल्या स्वातंत्र्यांचा अमृतमोहत्सव साजरा करत आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहोत. याचे श्रेय भारत देशातील संत परंपरा तसेच ऋषींना असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. भारत ही संतांची भूमी असल्यामुळे हा देश शाश्वत आहे.’

‘काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय मार्गांना चार लेन करण्याच्या भूमिपूजनाची संधी मिळाली. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची सुरुवात पाच टप्प्यात होणार. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यात पूर्ण होईल. या सर्व टप्प्यात ३५० किमीहून अधिक लांबीचे महामार्ग बनतील. यासाठी ११ हजार कोटींहून अधिक खर्च केला जाईल. या प्रयत्नांमुळे या भागातील विकासाला चालना मिळेल, असे मोदी यावेळी म्हणाले.’

तसेच ‘आज सौभाग्याने शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी मला देहूत येण्याचे सौभाग्य लाभले. ज्या शिळेवर स्वतः तुकाराम महाराजांनी १३ दिवस तपस्या केली. जी शिळा तुकाराम महाराजांच्या वैराग्याची साक्षीदार होती. त्यामुळे ही केवळ शिळा नाही तर भक्ती आणि ज्ञानाची आधारशिला आहे. देहूचे शिळा मंदिर केवळ भक्ती-शक्तीचे केंद्र नाही, तर भारताच्या सांस्कृतिक भविष्यालादेखील प्रशस्त करते. या पवित्र स्थानाच्या पुननिर्माणासाठी मी मंदिर न्यास आणि सर्व भक्तांचे हृदयातून आभार व्यक्त करतो.’ दरम्यान, या कार्मक्रमात नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल होताच त्यांचा तुकोबांची पगडी, उपरणे आणि तुळशीची माळ घालून नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान मुंबईत दाखल होतील. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मोदी हे उपस्थित राहतील. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami