मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं संपूर्ण देशभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता तिसरी लाट येत असून लहान मुलांसाठी ही लाट धोकादायक ठरू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे, कोरोना संक्रमण होऊ नये, यासाठी प्रत्येक जण चिंतेत आहे. या घातक विषाणूची लागण होण्यापासून स्वतःचा आणि कुटुंबियांचा बचाव कसा करावा, यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. म्हणूनच ‘कौटुंबिक आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन’ (१२ जून) च्या निमित्ताने संसर्गजन्य आजारांपासून कुटुंबातील सदस्यांना दूर ठेवण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, याबाबत आहारतज्ज्ञ विदिशा पारेख माहिती सांगत आहेत.
आपलं कुटुंब सुखी असावं. कुटुंबातील सर्व सदस्यांचं आरोग्य चांगल राहावं, असे प्रत्येकाला वाटतं. निरोगी हे पहिले सुख, असं उगीच म्हणत नाहीत. सुखी कुटुंबाची व्याख्या म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम असणं. कुटुंब म्हणजे प्रत्येकांची एक ताकद असते. कितीही मोठे संकट येऊ दे किंवा एखादा गंभीर आजार झालेला असल्यास कुटुंबाची भक्कम साथ असेल तर यातूनही सुखरूप बाहेर पडता येऊ शकते. त्यामुळे सध्याच्या या कोविड काळातही कुटुंबियांनी एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा फटका हा लहान मुलांना बसत असल्याचं बोलले जात आहे. अनेक लहान मुलं या कोरोना विषाणूला बळी पडतायेत. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने कोणत्याही संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांना हा आजार होऊ शकतो. यामुळे कुटुंबात लहान मुलं असल्यास पालकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. लहान मुलांना कोविड-१९ संक्रमणापासून रोखण्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, हे डॉक्टरांकडून जाणून घेतले पाहिजे.
कुटुंबियांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी कोणत्या सवयी लावून घेणं आवश्यक आहे –
· तोंडावर मास्क वापरा
· हात स्वच्छ करण्यासाठी साबण / सॅनिटायझरचा वापर करा
· बोलताना सामाजिक अंतर पालणं आवश्यक आहे.
· इतर मुले किंवा कुटुंबातील सदस्यांसह बोलताना अंतर ठेवा
· आजारी लोकांच्या आसपास राहणे टाळा आणि खोकला व शिंकताना नेहमी तोंडावर रूमाल धरा.
· कोरोना विषाणूपासून कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना कोविड-१९ लस द्यावी.
· जर आपल्याला खोकला, शरीरावर वेदना, ताप, आणि पोटदुखीसारखी लक्षणे दिसली तर कुटुंबातील इतर सदस्यांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
· मुलांद्वारे वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागावर निर्जंतुकीकरण करा. घराचे पृष्ठभाग स्वच्छ ठेवा.
· आपल्या मुलांना लिफ्टच्या बटणावर स्पर्श करु देऊ नका.
· बाहेरून घरात आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत. हात स्वच्छ केल्याशिवाय तोंडाला, नाकाला आणि डोळ्यांना स्पर्श करू नयेत.
· संतुलित आहारासाठी नोंदणीकृत डाएटिशियनचा सल्ला घ्या आणि संतुलित आहाराचा अवलंब करा.
· नियमित आहारात हंगामी ताजे फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगदाणे आणि तेलबिया, शेंगदाणे आणि डाळींचा समावेश करा.
· दररोज कुटुंबियांसह जेवण घ्या.
· तळलेले, जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, सोडा आणि पॅकेट पदार्थ आणि शितपेयांचे अतिरिक्त सेवन करणं शक्यतो टाळा.
· दारू आणि धूम्रपान सेवन करणं टाळावेत.
· कुटुंबातील सदस्य आणि लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना योग्य तो आहार द्या.
· सर्वांना एकत्रितपणे घरातच व्यायाम करा. योगा, प्राणायाम अशासारखे व्यायाम करणं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. योग फक्त प्रशिक्षित व्यावसायिकांच्या देखरेखीखाली करा.
· किमान 10 मिनिटांसाठी दररोज आपल्या मुलांसह ध्यान करा. कुटुंबातील वृद्ध सदस्य आणि मुलांची काळजी घ्या. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्धाला कोणताही आजार असल्यास त्यावरील औषध ते वेळेवर घेतायेत का? याची वारंवार खातरजमा करून घ्या. कुटुंबात कोणाला कुठलाही त्रास जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा. वेळीच निदान व उपचार झाल्यास आजारातील गुंतागुंत टाळता येऊ शकते.