मुंबई – लॉकर्समध्ये किंमती वस्तू आणि दागदागिने ठेवणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवे नियम आणले आहेत. त्यानुसार लॉकरमध्ये काही गैर घडल्यास तुम्हाला १०० पट भरपाई मिळू शकेल. म्हणजेच जर बँक तुमच्याकडून वार्षिक 5,000 रुपये लॉकर फी आकारत असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरबीआयने बँक लॉकर्सबाबत बँकांची जबाबदारी निश्चित केली आहे.
हे नवीन नियम लॉकर आणि सुरक्षित कस्टडी या दोहोंना लागू होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयला फेब्रुवारी 2021 मध्ये 6 महिन्यांच्या आत लॉकर व्यवस्थापनाबाबत सर्व बँकांसाठी एकसमान नियम लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बँकांनीही त्यांच्या लॉकरबाबत नवीन नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनद्वारे बँका ड्राफ्ट लॉकर कराराची अंमलबजावणी करणार आहेत.
सर्व सरकारी आणि खासगी बँका त्यांच्या ग्राहकांना लॉकर सुविधा देतात आणि त्यासाठी त्या वार्षिक शुल्कदेखील आकारतात. ग्राहकांनी लॉकरमध्ये ठेवलेल्या त्यांच्या मौल्यवान वस्तूंची यादी तयार करावी. जर तुम्ही त्यातून कोणती वस्तू काढली किंवा नवीन वस्तू ठेवल्या तर, तुम्हाला त्याची पूर्ण माहिती असायला हवी. तुम्हाला तुमच्या वस्तूंबद्दल माहिती नसल्यास, तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत नुकसानीचा दावा करू शकणार नाही.
… तर बँक लॉकर तोडू शकते
अनेकजण लॉकरमध्ये वस्तू ठेवतात आणि विसरून जातात. त्यामुळे लॉकर्स वर्षातून किमान एकदा तरी उघडणे आवश्यक आहे. जर लॉकर अनेक वर्षांपासून बंद राहिल्यास बँक नियम प्रक्रियेचे पालन करून तुमचे लॉकर तोडू शकते. मात्र, तसे करण्यापूर्वी बँकेला ग्राहकाला नोटीस पाठवावी लागेल. तसेच, लॉकर अनेक वर्षांपासून बंद असेल, तर त्याची माहितीही तुम्हाला बँकेला द्यावी लागेल. तुम्हीही बँकेचे लॉकर वापरत असाल तर नवीन नियमांचं पालन करणं आवश्यक असेल. तसेच लॉकरमध्ये ठेवलेल्या तुमच्या दागिन्यांची आणि वस्तूंची यादी करायला विसरू नका.