सुझूकी मोटर कंपनी भारतात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

वाहन निर्मिती कंपनी सुझूकी मोटर आता भारतात 10 हजार ४४० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी ही गुंतवणूक होणार असून कंपनीच्या वतीने गुजरातमध्ये बॅटरी निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीमुळे भारतात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना मिळू शकेल असा दावा निक्केईच्या बिजनेस रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

सुझूकी मोटर कॉर्पोरेशन ही कंपनी जपानी कंपनी असून वाहन निर्मितीतील अग्रणी कंपनी आहे. या कंपनीने २०१९ मध्येच गुजरात सरकारसोबत करार केला होता. ऑटोमोटीव्ह इलेक्ट्रॉनिक्स पावर प्रायव्हेट लिमिटेड आणि जपान तोशिबा कॉर्पोरेशन यांच्यासह गुजरात सरकारसोबत करारबद्ध झाला होता. या करारानुसार अहमदाबाद जिल्ह्यातील हंसलपूर परिसरात लिथियम -आयन बँटरीचा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी दोन टप्प्यात गुंतवणूक करण्याच्या करारावर सह्या झाल्या होत्या. त्यानंतर या प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान यांच्यामध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, निक्केईच्या बिजनेसमध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार भारत सरकार सध्या पर्यावरपूरक वाहनांच्या निर्मितीवर भर देत आहे. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली तर वाहनापासून होणाऱ्या प्रदुषणाला आळा बसेल. त्यामुळे भारतात ही गुंतवणूक फार महत्त्वाची आहे. तसेच, या गुंतवणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यामध्ये चर्चा देखील झाल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.