Jio Financial Service | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (Jio Financial Services) ने कर्ज क्षेत्रात मोठं पाऊल टाकलं आहे. रिलायन्स समूहातील या कंपनीने आता डिजिटल ‘लोन अगेंस्ट सिक्युरिटीज’ (Loan Against Securities – LAS) सेवा सुरू केली असून, ग्राहकांना केवळ 10 मिनिटांत जिओफायनान्स ॲप (JioFinance App) च्या माध्यमातून 1 कोटी रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे.
एनबीएफसीमार्फत नवा प्लॅटफॉर्म
कंपनीच्या एनबीएफसी शाखा जिओ फायनान्स लिमिटेड (Jio Finance Limited) मार्फत ही सुविधा आणण्यात आली आहे. शेअर्स आणि म्युच्युअल फंड्ससारख्या गुंतवणुकीच्या आधारावर डिजिटल प्रक्रियेद्वारे हे कर्ज मिळणार असून, त्यावर सुरुवातीचा व्याजदर 9.99% पासून असेल.
जिओने याबाबत अधिकृत माहिती देताना सांगितले की, “ग्राहकांना त्यांच्या सिक्युरिटीज (securities) विकायच्या गरजेशिवाय तात्काळ निधीची सोय होईल. LAS सेवा ही संपूर्णपणे डिजिटल असून, ती JioFinance App वर सहज उपलब्ध आहे.”
डिजिटल बँकिंगपासून विमा सल्ल्यापर्यंत सुविधा
गेल्या वर्षी मे महिन्यात जिओ फायनान्शियलने आपल्या अॅपचे बीटा व्हर्जन लाँच केले होते. या अॅपद्वारे UPI व्यवहार, बिल पेमेंट, विमा सल्ला, बचत खाती, आणि आता डिजिटल कर्ज सेवा या सर्व गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत.
कोणतेही प्रीपेमेंट शुल्क नाही
जिओ फायनान्स लिमिटेड (JFL) ने स्पष्ट केलं आहे की, हे कर्ज जास्तीत जास्त 3 वर्षांच्या कालावधीसाठी असेल. त्यावर कोणतंही प्रीपेमेंट शुल्क (foreclosure charges) आकारलं जाणार नाही. म्हणजेच ग्राहक इच्छेनुसार कर्ज लवकर फेडू शकतील.
कंपनीने ही सेवा आर्थिक गरजांमध्ये लवचिकता निर्माण करण्याच्या हेतूने तयार केली असून, हे ॲप ग्राहकांसाठी एक डिजिटल-प्रथम आर्थिक सेवा प्लॅटफॉर्म ठरणार आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.