युपीआय पेमेंट करताना अशी घ्या काळजी

कोरोना काळात डिजिटल व्यवहारात प्रचंड वाढ झाली आहे. यूपीआय इंटरफेसच्या मदतीने पेमेंटची सुविधा देणारे अनेक अ‍ॅप्स आज उपलब्ध आहेत. या आधारे खातेदार एक रुपयांपासून हजारो रुपये दुसर्‍याच्या खात्यात सहजपणे ट्रान्सफर करु शकतो. अगदी भाजीवाल्यापासून शॉपिंग मॉल्सपर्यंत सर्वत्र याचा वापर सर्रास केला जात आहे. पण यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असते.

  • या माध्यमातून पेमेंट करताना आपल्याला केवळ आपला यूपीआय अ‍ॅड्रेस किंवा मोबाईल नंबर शेअर करावा लागतो. ग्राहकांना आणखी सुविधा करण्यासाठी अलीकडील काळात क्यूआर कोड किंवा व्हच्युर्अल अ‍ॅड्रेस (व्हीपीए) शेअर करण्याचा ट्रेंड देखील वाढला आहे. यासाठी अनेकदा मोबाईलची स्क्रिन शेअरिंग केली जाते; पण अशावेळी यूपीआय अ‍ॅपची स्क्रिन देखील सार्वजनिक होते. त्याचबरोबर ओटीपी नोटिफिकेशन देखील सार्वजनिक होते. त्यामुळे स्क्रिन शेअर करताना युपीआय अ‍ॅप्लिकेशनचा अ‍ॅक्सेस देऊ नये. यासाठी सेटिंगमध्ये जावून अशा प्रकारच्या स्क्रिन शेअर अ‍ॅप्ससाठी अ‍ॅक्सेसचा पर्याय टर्न ऑफ करावा.
  • यूपीआय अ‍ॅप्समध्ये पैसा ट्रान्सफर करताना पिन टाकताना प्राप्तकर्त्याचे नाव समोर येते. अशावेळी जेव्हा एखाद्याला पैसे पाठवतो, तेव्हा त्याचे डिटेल्स तपासून घ्यावे. जेव्हा आपण क्यूआर कोड स्कॅन कराल, तेव्हा नोंदणीकर्त्याचे नाव स्क्रिनवर दिसते. व्यवहाराची प्रक्रिया सुरू ठेवताना सदर नावाची तपासणी आणि खातरजमा करावी.
  • अनेकदा हॅकर्समंडळी ग्राहकांना बनावट लिंक पाठवतात आणि या लिंकच्या मदतीने मोबाईल हॅक करतात. तसेच क्यूआर कोड पाठवले जातात. ते स्कॅन केल्याने आपल्याला पैसे मिळवण्याऐवजी खाते रिकामे होते. याशिवाय केवायसी व्हेरिफिकेशनच्या नावावर पासवर्ड आणि सीव्हीव्हीची माहिती घेतली जाते. याचा गैरवापर करुन आपले खाते रिकामे केले जाऊ शकते. त्यामुळे अशा फसवणूक करणार्‍या लिंक्सकडे कधीही लक्ष देऊ नये आणि क्लिक करू नये.
  • आपण खाते किंवा मोबाईल क्रमांक आपल्या अ‍ॅपला जोडतानाही काही वेळा चूक होऊ शकते. परिणामी आपले पैसे नको त्या व्यक्तीला जावू शकतात. अशावेळी आपण मोठी रक्कम ट्रान्सफर करत असताना रक्कम घेणार्‍या व्यक्तीचा यूपीआय आयडी घ्यावा. तसेच खबरदारी म्हणून आपण एक रुपया ट्रान्सफर करून खात्याची पडताळणी करून घ्यावी आणि त्यानंतरच मोठी रक्कम स्थानांतरित करावी.
Scroll to Top