अदानी विल्मरच्या गुंतवणूकदारांना महिन्याभरात दुप्पट परतावा

रशिया – युक्रेनच्या वादामुळे शेअर बाजारात बरीच पडझड झाली आहे. मात्र, अदानी विल्मर कंपनीच्या स्टॉकने याच काळात मोठी उसळी घेतली आहे. अवघ्या दीड महिन्यात या स्टॉकची रक्कम दुप्पटीने वाढली असून गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाला आहे.

८ फेब्रुवारी रोजी अदानी समूहातील अदानी विल्मरचा शेअर बाजारात लिस्टेड झाला होता. सुरुवातीला या शेअरची किंमत २५० होती. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. मात्र, अदानी विल्मरच्या गुंतवणूकदारांची या दिवसांत चांदी झाली. कारण गेल्या दीड महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल दुप्पटीने वाढ झाली आहे. सोमवारी या कंपनीचा शेअर ४२४.९० रुपयांवर खुला झाला होता. बंद होताना त्याची किंमत ४६१.१५ इतकी होती. तर, मंगळवारी हा शेअर ५०४.७५ रुपयांपर्यंत पोहोचला. ५०३.१० रुपयांवर शेअर आल्यावर बाजार बंद झाला. म्हणजेच या कंपनीचा शेअर ९.१३ टक्क्यांनी वधारला आहे.

अदानी विल्मर कंपनी ही अदानी समूहातील उपकंपनी आहे. सिंगापूरची विख्यात कंपनी विल्मर समूहाची या कंपनीत ५०-५० टक्के भागीदारी आहे. या कंपनीअंतर्गत खाद्य तेलाच्या उत्पादनांची विक्री केली जाते. भारतीय बाजारपेठेत फॉर्च्युन या तेलाची मोठी बाजारपेठ आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामुळे तेलाच्या किंमती भरमसाठ वाढत आहेत. या युद्धामुळे सूर्यफूल तेलाच्या आयातीवर परिणाम होत आहे. त्यामुळे या वाढलेल्या दराचा फायदा अदानीच्या कंपनीला होणार असल्याची बाजारात चर्चा आहे.

Scroll to Top