सोने दर ५५ हजार पार, चांदीचा भावही वाढला

कोरोना, लॉकडाऊनमुळे सर्वांनाच थोडा का होईना पण आर्थिक तोटा सहन करावा लागला. मात्र तरीही सोन्याची झळाळी काही कमी झाली नाही. भारतासह अनेक देशांमध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. मात्र आता कुठे सोने स्वस्त झाल्यासारखे वाटत होते, तर आज सोने दरात मागील दीड वर्षातील सर्वोच्च वाढ झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर बुधवारी सोन्याचा भाव ५५ हजार पार गेला. सोन्याचा वायदे भाव १.६४ टक्क्यांच्या वाढीसह ५५,१११ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. हा दर मागील दीड वर्षातील सर्वोच्च दर आहे. महत्त्वाचे म्हणजे जाणकारांच्या मतानुसार, सराफा बाजारात सोन्याच्या किंमती पुढील काही दिवसांत ५६ हजारांवर पोहोचू शकतात.

रशियावर अमेरिका आणि इतर सहयोगी देशांच्या निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठेत पिवळ्या धातूच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारातही पाहायला मिळत आहे. तर आज चांदीचा वायदे भावदेखील वधारला. २.१९ टक्क्यांच्या वाढीसह चांदीचा भाव ७२,९५० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. तसेच सोने दरावर पुढे मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Scroll to Top